स्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला. पण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का ? तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते. अभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म...